कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथां मुकुटी झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १ ॥
रवींदु दावानल पूर्ण भाळी, स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी ।
ब्रह्मांडधीशा मदनांतकारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २ ॥
जटा विभूति उटि चंदनाची, कपालमाला प्रित गौतमीची ।
पंचानना विश्वनिवांतकारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३ ॥
वैराग्ययोगी शिव शूलपाणी, सदा समाधी निजबोधवाणी ।
उमानिवासा त्रिपुरांतकारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ४ ॥
उदार मेरु पति शैलजेचा, श्रीविश्र्वनाथ म्हणती सुरांचा ।
दयानिधीचा गजचर्मधारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ५ ॥
ब्रह्मादि वंदी अमरादिनाथ, भुजंगमाला धरि सोमकांत ।
गंगा शिरीं दोष महा विदारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ६ ॥
कर्पूरगौरी गिरिजा विराजे, हळाहळें कंठ निळाचि साजे ।
दारिद्र्यदुःखे स्मरणें निवारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ७ ॥
स्मशानक्रीडा करितां सुखावे, तो देव चूडामणि कोण आहे ।
उदासमूर्ती जटाभस्मधारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ८ ॥
भूतादिनाथ अरि अंतकाचा, तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा ।
राजा महेश बहुबाहुधारी, ]तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ९ ॥
नंदी हराचा हर नंदिकेश, श्रीविश्वनाथ म्हणती सुरेश ।
सदाशिव व्यापक तापहारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १० ॥
भयानक भीम विक्राळ नग्न, लीलाविनोदें करि काम भग्न ।
तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ११ ॥
इच्छा हराची जग हे विशाळ, पाळी रची तो करि ब्रह्मगोळ ।
उमापति भैरव विघ्नहारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १२ ॥
भागीरथीतीर सदा पवित्र, जेथें असे तारक ब्रह्ममंत्र ।
विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १३ ॥
प्रयाग वेणी सकळा हराच्या, पादारविंदी वाहाती हरीच्या ।
मंदाकिनी मंगल मोक्षकारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १४ ॥
कीर्ती हराची स्तुति बोलवेना, कैवल्यदाता मनुजा कळेना ।
एकाग्रनाथ विष अंगिकारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १५ ॥
सर्वांतरी व्यापक जो नियंता, तो प्राणलिंगाजवळी महंता ।
अंकी उमा ते गिरिरुपधारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १६ ॥
सदा तपस्वी असे कामधेनू, सदा सतेज शशिकोटिभानू ।
गौरीपती जो सदा भस्मधारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १७ ॥
कर्पूरगौर स्मरल्या विसांवा, चिंता हरी जो भजकां सदैवा ।
अंती स्वहीत सुवना विचारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १८ ॥
विरामकाळीं विकळ शरीर, उदास चित्तीं न धरीच धीर ।
चिंतामणी चिंतनें चित्तहारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १९ ॥
सुखावसाने सकळ सुखाची, दुःखावसाने टळती जगाचीं ।
देहावसाने धरणी थरारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २० ॥
अनुहात शब्द गगनी न माय, त्याने निनादें भव शून्य होय ।
कथा निजांगे करुणा कुमारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१ ॥
शांति स्वलीला वदनीं विलासे, ब्रह्मांडगोळी असुनी न दिसे ।
भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २२ ॥
पीतांबरे मंडित नाभि ज्याची, शोभा जडीत वरि किंकिणीची ।
श्रीदेवदत्त दुरितांतकारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २३ ॥
जिवाशिवांची जडली समाधी, विटला प्रपंची तुटली उपाधी ।
शुद्धस्वरें गर्जति वेद चारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २४ ॥
निधानकुंभ भरला अभंग, पाहा निजांगें शिव ज्योतिर्लिंग ।
गंभीर धीर सुर चक्रधारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २५ ॥
मंदार बिल्वें बकुलें सुवासी, माला पवित्र वहा शंकरासी ।
काशीपुरी भैरव विश्व तारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २६ ॥
जाई जुई चंपक पुष्पजाती, शोभे गळां मालतिमाळ हातीं ।
प्रताप सूर्यशरचापधारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २७ ॥
अलक्ष्यमुद्रा श्रवणीं प्रकाशे, संपूर्ण शोभा वदनीं विकसे ।
नेई सुपंथे भवपैलतीरीं, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २८ ॥
नागेशनामा सकळा जिव्हाळा, मना जपें रे शिवमंत्रमाळा ।
पंचाक्षरी घ्यान गुहाविहारीं, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २९ ॥
एकांति ये रे गुरुराज स्वामीं, चैतन्यरुपीं शिवसौख्य नामीं ।
शिणलों दयाळा बहुसाल भारी, तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३० ॥
शास्त्राभ्यास नको श्रुति पढुं नको तीर्थासि जाऊं नको ।
योगाभ्यास नको व्रतें मख नको तीव्रें तपें तीं नको ।
काळाचे भय मानसीं धरुं नको दुष्टांस शंकूं नको ।
ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडू नको ॥ ३१ ॥